Tuesday, October 15, 2013

पानिपत



पानिपतच्या लढाईत मिळालेला विजय हा अब्दालीचा शेवटचा विजय ठरला. या कालखंडात सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेपाचपर्यंतच्या एका दिवसाच्या अल्पावधीत असे भयंकर, घनघोर, जीवघेणे युद्ध घडल्याचे आणि त्यामध्ये दोन्ही बाजूंची दीड लाख माणसे आणि ऐंशी हजार जनावरे मेल्याचे दुसरे उदाहरण नाही. या युद्धात महाराष्ट्रातील प्रत्येक माजघरातल्या कुंकवाचा करंडा पानिपतावर लवंडला. या भीषण युद्धात मराठे पराभूत झाले, तसेच अब्दालीचीहि मोठी हानी झाली. या युद्धाबाबत अहमद अब्दालीनेच लिहून ठेवले आहे-"दक्षिण्यांनी (मराठ्यांनी) पानिपतावर मजबूत छावणी कायम केली होती. युद्धदिवशी त्यांनी अत्यंत निकराने आमच्या लष्करावर पुन्हा पुन्हा हल्ले चढविले. मराठ्यांचे हे असमान्य शौर्य पाहण्यासाठी त्यादिवशी आमचे रूस्तम आणि इस्किंदारसारखे (अफगाणांच्या महाकाव्यातील कृष्णार्जुन) वीर मौजूद असते, तर त्यांनी मराठ्यांचा महापराक्रम पाहून आश्चर्याने तोंडात बोटे घालुन चावली असती. मराठ्यांसारखी युद्धाची अशी लालसा, अशी खुमखुमी आणि इतके शौर्य इतरांकडून होणे वा दिसणे अशक्य".